मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. यापैकी अर्धी रुग्णसंख्या एकट्या मुंबईत आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेची (BMC) डोकेदुखी वाढवणारं कारण समोर आलं आहे.
मुंबईत अनेकजन कोविड सेल्फ टेस्ट (Covid Self Test Kits) किटचा वापर करत आहेत. लक्षण आढळल्यानंतरही अनेक जण लॅबमध्ये ने जाता घरीच कोरोना टेस्ट करत असल्यामुळे कोरोनाचा योग्य आकडा मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. तसंच कोरोनाबाधित रुग्णांची ओळख पटत नसल्याने संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
मुंबई पालिकेने दिले आदेश
मुंबई महापालिकेने ही गोष्ट आता गांभीर्याने घेतली आहे. घरी कोरोना चाचणी करणाऱ्यांची माहिती आता महापालिका ठेवणार आहे. महानगरपालिकेच्यावतीने आणि सरकारच्या वतीने आरटीपीसीआर टेस्ट निशुल्क ठेवली आहे. मात्र मागच्या 15 दिवसांत अनेकजण घरी टेस्टिंग किट घेऊन जात आहेत. त्यामुळे मेडिकल डिस्ट्रीब्युटर आणि मेडिकल चालकांना टेस्टिंग किट घेऊन जाणाऱ्यांची माहिती आणि पत्ता ठेवण्याचे आदेश सरकारनं दिलेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली.
अचूक निदानाची खात्री नाही
सेल्फ टेस्ट किटमुळे अनेक धोके आहेत. यातला महत्त्वाचा धोका म्हणजे सेल्फ टेस्टने केलेली चाचणी अचूक असेलच असं सांगता येणार नाही. तसंच सेल्फ टेस्टमुळे पालिकेकडे नोंद होत नाही. रुग्णाची ओळख लपून राहिल्याने कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढू शकतो.
होम क्वारंटाईन रुग्णांसाठी नियम
घरातच चाचणी करणाऱ्यांना अॅडमिट करायचं असेल तर पुन्हा चाचणी करण्याचा निर्णय मनपाने घेतलाय. घरच्या घरी केलेल्या चाचणी केल्यास उपचार न करण्याचा निर्णय मनपानं घेतलाय. घरातल्या घरात केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे अहवाल अचूक वा खात्रीशीर नसल्यामुळे त्याआधारे थेट उपचार करणे धोक्याचे आहे असं महापालिकेने म्हटलंय.
तर खासगी डॉक्टरांवर होणार कारवाई
महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सूचना न देता कोरोनाची लक्षणं असलेल्या रूग्णांवर परस्पर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. लक्षणं असतानाही रूग्णांना चाचणी न करण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. त्यामुळे येत्या काळात फ्लू किंवा सर्दी, खोकल्याच्या सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यास खासगी डॉक्टर टाळाटाळ करण्याची चिन्हे आहेत.