मुंबई : डॉन अरुण गवळी (ArunGawli) याची ओळख असलेली मुंबईतील दगडी चाळ (Dagdi Chawl)आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे. या ठिकाणाहून डॉनची सूत्रे हालत होती. ही चाळ अरुण गवळीची ओळख बनली होती. आता या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. या दगडी चाळीवर आता 40 मजली टॉवर उभारला जाणार आहे. याची माहिती म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्विकास मंडळ (MBRRB)अध्यक्ष विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी दिली. यात दगडी चाळीतील 10 इमारतींचा समावेश आहे.
डॉन अरुण गवळी याची दक्षिण मुंबईतील एक बहुपरिचित अशी दगडी चाळ येत्या दिवसांमध्ये पाडली जाणार आहे. म्हाडामार्फत या चाळीच्या पुर्नविकास करण्यात येणार आहे. म्हाडामार्फत या चाळीला लेटर ऑफ इंटेन्ट जारी करण्यात आला आहे. डॉन अरुण गवळी आणि दगडी चाळ हे कनेक्शन सगळ्यांचा माहिती असेल. गवळीचे राहते घर असलेली चाळ ही एकेकाळी दहशत असलेली एक चाळ होती. पण गेल्या अनेक वर्षात या चाळीतील नवरात्रौत्सवातील देवीही अनेक मुंबईकरांना परिचित आहे.
म्हाडाचे मुंबई दुरुस्ती आणि पुर्नरचना मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी दगडी चाळीसाठी लेटर ऑफ इंटेंट दिल्याची माहिती दिली आहे. म्हाडा बोर्डाकडून दगडी चाळीच्या भागातील सर्व इमारतींना लेटर ऑफ इंटेंट देण्यात आले आहे. त्यानंतर या पुर्नविकासासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. सध्या दगडी चाळ पुर्नविकासात एकूण दहा इमारती आहेत. या दहा इमारतींपैकी काही इमारती या अरुण गवळी याच्या मालकीच्या आहेत. तर उरलेल्या दोन इमारतीतही अरुण गवळीचे घर आहे.
डिसेंबर 2020 मध्ये अरुण गवळी यांच्या कुटुंबीयानी दगडी चाळीच्या पुर्नविकासाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. दक्षिण मुंबईतील एका बिल्डरसोबत हा करार करण्यात आला आहे. म्हाडाकडून यापुढच्या काळात पात्रताधारकांची यादी निश्चित करण्यात येणार. त्यानंतरच एनेक्चर दोन यादी तयार करुनच एनओसी देण्यात येईल, असे घोसाळकर यांनी सांगितले.