वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनो सावधान, आता पोलीस थेट तुमच्या दारात

 क्लॅम्पिंग स्वॉड, कॉल सेंटरच्या माध्यमातून वसुलीचा प्रयत्न, पण अपयश आल्याने आता मुंबई पोलिसांनी उचललं हे पाऊल.

Updated: Jun 15, 2021, 06:30 PM IST
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांनो सावधान, आता पोलीस थेट तुमच्या दारात title=

प्रशांत अंकुशराव, मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे निघालेल्या ई-चलानच्या वसुलीसाठी आता पोलीस थेट तुमच्या घरी येणार आहेत. ही पद्धत सुरू झाल्यापासून तब्बल 400 कोटींची वसुली बाकी असल्यानं मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचललंय. सिग्नल मोडणारे किंवा हेल्मेटशिवाय बाईक चालवणारे कमी नाहीत. 

सिग्नल तोडाल, तर पोलीस थेट घरी

2017 मध्ये मुंबई पोलिसांनी ई चलान पद्धत आणली. तुमच्याकडून जागेवर दंड वसुली न करता मोबाईलवर नियम मोडल्याचा फोटो आणि दंडाचं चलान पाठवलं जातं. मात्र अनेक जण ते भरत नाहीत. त्यामुळे 400 कोटींची थकबाकी झालीये. क्लॅम्पिंग स्वॉड, कॉल सेंटरच्या माध्यमातून वसुलीचा प्रयत्न झाला. मात्र त्यातून केवळ 15 कोटीच वसूल झाले. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांनी पन्नास पथकं तयार केली आहेत. त्यांच्याकडे थकबाकीदारांची यादी देण्यात आलीये... 

ई-चलानच्या वसुलीसाठी पोलीस सरसावले

वाहनचालकांनी याचं स्वागत केलंय. मात्र चुकीचे नंबर आणि पत्ते देणा-यांची वसुली कशी करणार, हा मोठा प्रश्न आहे. ई-चलान जारी केलं तरी काही होत नाही, पैसे भरावे लागत नाहीत, हा गोड गैरसमज आता दूर होणार आहे. तुमच्या नावे चलान आलं असेल, तर लगेच पैसे भरा. नाहीतर पोलीस कधीही दारावर टकटक करतील.