'सामना'तील अग्रलेख लता मंगेशकरांच्या आवाजापेक्षाही गोड वाटतोय- धनंजय मुंडे

युतीच्या घोषणेपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून केंद्र सरकार आणि भाजपच्या नेत्यांवर सातत्याने टीका होत असे. 

Updated: Feb 20, 2019, 03:34 PM IST
'सामना'तील अग्रलेख लता मंगेशकरांच्या आवाजापेक्षाही गोड वाटतोय- धनंजय मुंडे title=

मुंबई: एकमेकांच्या अब्रूचे जाहीर धिंडवडे काढून झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपने निवडणुकीच्या तोंडावर युतीची घोषणा केली. यावरून अनेकजण शिवसेना-भाजपच्या संधीसाधू राजकारणावर टीका करत आहेत. मात्र, वारंवार राजीनाम्याची धमकी देणाऱ्या आणि स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला याचा अधिक फटका बसत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही बुधवारी याच मुद्यावरून शिवसेनेला सणसणीत टोला हाणला. ‘सामना’मधील आजचा अग्रलेख लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षाही गोड आहे, वाचलात का, अशी उपरोधिक टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

युतीच्या घोषणेपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून केंद्र सरकार आणि भाजपच्या नेत्यांवर सातत्याने टीका होत असे. मात्र, आता युती झाल्यामुळे शिवसेनेला अग्रलेखातील आपल्या भावनांना आवर घालावा लागणार आहे. त्यामुळे युतीच्या घोषणेनंतर 'सामना'च्या अग्रलेखात काय वाचायला मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अपेक्षेप्रमाणे शिवसेनेने 'तलवार म्यानबंद नाही वारा आमच्या दिशेने वळला' या अग्रलेखातून आपलीच बाजू वरचढ दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे की, युतीच्या घोषणेचे अपेक्षित स्वागत झाले नाही. जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली असल्याचा टोला शिवसेनेने विरोधकांना लगावला होता.