कोरोना टेस्टची संख्या वाढवल्याच्या सरकारी दाव्याची फडणवीसांकडून चिरफाड, म्हणाले...

सरकार ठोस उपाययोजनांऐवजी आकडेवारीची सांगड घालण्यात मग्न

Updated: Aug 9, 2020, 07:13 PM IST
कोरोना टेस्टची संख्या वाढवल्याच्या सरकारी दाव्याची फडणवीसांकडून चिरफाड, म्हणाले... title=

मुंबई: राज्यातील कोरोना व्हायरसचा Coronavirus प्रादुर्भाव रोखताना सरकारने केवळ आकडेवारीचे व्यवस्थापन करण्यापेक्षा ठोस वैज्ञानिक दृष्टीकोनातून उपाययोजनांवर भर द्यावा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचा दावा सध्या महाविकासआघाडी सरकारकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन सरकारच्या दाव्याची चिरफाड केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ६ ऑगस्टला राज्यात एकूण ७८,७११ कोरोना चाचण्या झाल्याचे सरकारी आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, यापैकी ५०,४२१ म्हणजे ६४ टक्के चाचण्या या अँटीजेन स्वरुपाच्या होत्या. तर केवळ २७,४४० चाचण्या या RT-PCR स्वरुपाच्या होत्या. उर्वरित ८५० चाचण्यांसाठी वेगळ्या पद्धतींचा अवलंब झाला होता.

विरोधी पक्षाने चांगल्या सूचना द्याव्यात, उगाच विरोध नको- राजेश टोपे

मात्र, अँटीजेन आणि RT-PCR चाचण्यांचे गुणोत्तर १:१ असे हवे. कारण, ६५ टक्के अँटीजेन चाचण्या फोल ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या निदानासाठी RT-PCR हाच अधिक विश्वासार्ह पर्याय असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. एका दिवसात ५४ हजारपेक्षा जास्त RT-PCR चाचण्या करण्याची आपली क्षमता आहे. राज्य सरकारने ही क्षमता पूर्णपणे वापरावी. कोरोनाच्या आकडेवारी लपवण्यापेक्षा किंवा तिचे व्यवस्थापन करण्याऐवजी राज्य सरकारने ठोस वैज्ञानिक उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर द्यावा, असा टोलाही यावेळी फडणवीस यांनी लगावला. 

शनिवारी राज्यात कोरोनाचे १२,८२२ नवे रुग्ण आढळले. एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ५,०३,०८४ एवढी झाली आहे. यापैकी १,४७,०४८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे, तर ३,३८,२६२ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.