EC Verdict on real Shiv Sena: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही पहिल्या दिवसापासून..."

devendra fadnavis on EC recognises Eknath Shinde faction as real Shiv Sena: मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी नोंदवलं आपलं मत

Updated: Feb 17, 2023, 07:45 PM IST
EC Verdict on real Shiv Sena: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "आम्ही पहिल्या दिवसापासून..." title=
devendra fadnavis eknath shinde

devendra fadnavis on EC recognises Eknath Shinde faction as real Shiv Sena: केंद्रीय निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह शिंदे यांच्या पक्षाला मिळालं ही आनंदाची बाब आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच  बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पक्षालाच नाव आणि चिन्ह मिळालं असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.

"हिंदहृयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणाऱ्या एकनाथ शिंदेंजी यांच्या पक्षाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आहे. ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. मी एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करतो," असं फडणवीस यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तसेच, "आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो खरी शिवसेना हीच आहे. कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथराव शिंदे साहेब करत आहेत. कोणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर हक्क सांगू शकणार नाही," असं फडणवीस म्हणाले.

"शिवसैनिक, शिवसेना आणि बाळासाहेबांचा विचार ज्यांच्याकडे आहे तीच खरी शिवसेना ठरणार हे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. आज या ठिकाणी जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तसंही आम्हाला याचा विश्वास होता. शिंदेजींना याचाही आत्मविश्वास होता. याचं कारण यापूर्वी इलेक्शन कमिशनने यापूर्वी वेगवेगळ्या पक्षांमध्ये अशी परिस्थिती आली त्यावेळी अशाच प्रकारचा निर्णय दिलेला आहे," असं फडणवीस यांनी म्हटलं.

"आमदार, खासदारांची संख्या लक्षात घेऊन निर्णय झालेले आहे. याचं कारण एखाद्या पक्षाची मान्यता त्या पक्षाला मिळेल्या मतांच्या आधारे असतं. ती मतसंख्या किंवा मतांची टक्केवारी आमदार, खासादारांच्या माध्यमातून ठरतं. मी पूर्ण निकाल वाचला नाही. मी पूर्ण विश्लेषण करणार नाही. मी शिंदेजींचं आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं अभिनंदन करतो," असं फडणवीस यांनी सांगितलं.