मुंबई पोलिसांनी एका 70 वर्षीय डॉक्टरला लुटणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. 23 वर्षीय तरुणाने आपण रुग्ण असल्याचा बनाव करत डॉक्टरला लुटलं होतं. पेडर रोड येथे ही घटना घडली असून तरुणाने चाकूचा धाव दाखवत डॉक्टरला लुटलं होतं. पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. अर्जून सोनकर असं या तरुणाचं नाव असून तो वरळीत वास्तव्यास आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. स्विग्गी या फूड डिलिव्हरी अॅपसाठी तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. मागील मे महिन्यापासून त्याने डिलिव्हरी बॉयचं काम सुरु केलं होतं.
अर्जून सोनकर हा रुग्ण असल्याचं नाटक करत डॉक्टर मंदाकिनी पिरनकर यांच्या दवाखान्यात गेला होता. मंदाकिनी पिरनकर या आपल्या अजून एका महिला डॉक्टरच्या मदतीने गेल्या 25 वर्षांपासून दवाखाना चालवत आहेत.
अर्जून सोनकर याने डॉक्टरांना आपल्याला बरं वाटत नसल्याचं सांगितलं होतं. तसंच अविनाश पासवान अशी आपली खोटी ओळख सांगितली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रक्तदाब कमी असल्याचं सांगितलं आणि त्याला एक रेफरन्स नोट देत रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. अर्जून सोनकरने दवाखान्यातून बाहेर पडण्याआधी 200 रुपये फीदेखील दिली होती.
पण दवाखान्यातून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच तो पुन्हा एकदा परत आला. यावेळी त्याने आपल्या कपड्याच्या बॅगेतून चाकू काढला आणि डॉक्टरच्या गळ्यावर ठेवला. यावेळी त्याने आरडाओरड न करण्याची धमकी दिली. यानंतर त्याने डॉक्टरला गळ्यातील 1 लाख किंमतीची सोन्याची चेन आणि लॉकेट काढण्यात सांगितलं. दरम्यान, लुटल्यानंतर पळ काढण्याआधी त्याने डॉक्टरला धक्का दिला.
"आरोपीने दवाखान्यात आपली एक बॅग सोडली होती. या बॅगेत हाताने लिहिलेल्या काही नोट्स होत्या. ज्यामध्ये त्याने आपल्याला हे करण्याची इच्छा नाही, मला माफ करा असं लिहिलं होतं. भावनिक नोट्स मागे सोडणं ही त्याची एक योजना होती. त्याला वाटलं होतं हे वाचल्यानंतर डॉक्टर कदाचित पोलिसांकडे तक्रार करणार नाही. तो एक खोटा रुग्ण म्हणून दवाखान्यात गेला होता आणि लुटणं हाच त्याचा उद्देश होता. चोरी केलेला माल अद्याप सापडलेला नाही. त्याने पहिल्यांदाच गुन्हा केला असून, वरळीत आपल्या पत्नीसह राहतो. आम्ही 16 हजारांची रोख रक्कम मिळवली आहे. यासह दवाखान्यात मागे सोडलेला चाकू, स्विग्गीचा टी-शर्ट जप्त केला आहे," अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीनिवास दरडे यांनी दिली आहे.
पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.