"जनतेच्या मनातलं युती सरकार महाराष्ट्रात यावं", दीपक केसरकर यांची झी 24 तासला माहिती

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे.

Updated: Jun 27, 2022, 08:13 PM IST
"जनतेच्या मनातलं युती सरकार महाराष्ट्रात यावं", दीपक केसरकर यांची झी 24 तासला माहिती title=

Eknath Shinde Rebel And Yuti Govt: विधानपरिषदेच्या निवडणुकांनंतर राज्यातील राजकीय चित्र एका दिवसात बदललं. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. गेल्या सात दिवसांपासून राजकीय डावपेच, आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्ष नेमका कधी संपेल? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून आहे. शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी झी 24 तासशी थेट गुवाहाटीवरून EXCLUSIVE चर्चा केली.

"लवकरच महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल. कोणासोबत जायचं हा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यायचा आहे. त्यांच्या निर्णयात कोणताही आमदार हस्तक्षेप करणार नाही, असं ठरवलेलं आहे. पंरतु आम्हाला इतका आदर आदरणीय उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहे, त्यांनी एक चांगला निर्णय घ्यावा. ज्या युतीला महाराष्ट्रातील जनतेला कौल दिला आहे.  त्या युतीला त्यांचे आशीर्वाद मिळावे आणि त्यांच्या मार्गदर्शनखाली महाराष्ट्रात युतीचं सरकार यावं.", असं आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं.

"विधिमंडळातला जो पक्ष आहे ती शिवसेना आम्ही आहोत. शिंदेसाहेब त्याचे नेते आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आता बाहेर पडावं. सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा. तरच त्यांचा मोठेपणा आहे. नाहीतर नुसतं चिकटून बसायचं आणि अविश्वास ठराव मंजूर करायचा. त्यांच्या मनात आहे की आमदार आले की आमच्या गोटात येतील. हे सर्व खोटं आहे.", असंही त्यांनी पुढे सांगितलं.

दुसरीकडे, बंडखोर शिवसेना आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारं सविस्तर पत्र लिहिलंय. यात संजय राऊतांना लक्ष्य करण्यात आलंय. राऊत शरद पवारांच्या गळ्यातील ताईत असून त्यांनीच भाजप आणि शिवसेनेचे संबंध बिघडवले असा आरोप पत्रात करण्यात आलाय. हे बंड नसून शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा असल्याचं केसरकरांनी म्हटलंय.