'ठेवीदारांनी यंत्रणेवर विश्वास ठेवा, लवकरच पैसे परत मिळतील'

बँक गैरव्यवहार प्रकरणात 420चा गुन्हा दाखल आहे.

Updated: Oct 16, 2019, 03:05 PM IST
'ठेवीदारांनी यंत्रणेवर विश्वास ठेवा, लवकरच पैसे परत मिळतील' title=

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई :  पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात प्रशासनावर कोणाचाही दबाव नसून योग्य दिशेने तपास होत आहे. बँकेतील ठेवीदारांनी तपास यंत्रणेवर विश्वास ठेवावा. लवकरात लवकर त्यांचे पैसे त्यांना परत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती डीसीपी श्रीकांत परोपकारी यांनी दिली. किल्ला कोर्टच्या बाहेर पीएमसी बँकेतील ठेवीदारांचा रोष बघता मुंबई पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेचे उपयुक्त आणि पीएमसी बँक घोटाळ्यातील तपासासाठी नेमून दिलेल्या एसआयटीचे प्रमुख श्रीकांत परोपकारी यांना पाचारण करण्यात आलं. त्यावेळी खातेधारकाना उद्देशून परोपकारी बोलत होते. आज 3 आरोपींना न्यायालयीन कोठडीची मिळाली. त्यामुळे हा रोष आणखी वाढला किला कोर्टाबाहेर या खातेधारकांनी उग्र आंदोलनही केले.

बँक गैरव्यवहार प्रकरणात 420चा गुन्हा दाखल आहे. त्यात सर्वाधिक14 दिवसाची पोलीस कोठडी मिळवण्यात पोलिसांना यश आले. सध्या या बँक संचालकाच्या मागावर आम्ही आहोत. यातील इतर दोषींवरही लवकरच कारवाई करू अशी माहीती परोपकारी यांनी 'झी २४ तास'ला दिली. 

या प्रकरणात संपत्तीचे तातडीने फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी कागदपत्र पाठवली आहेत. प्रत्येक पैशांचा हिशोब आम्ही शोधून काढू. तुमचे पैसे परत मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे. लपून छपून काम करणार नाही. शांतीने आलात तर सगळ्यांशी बोलून काय तपास सुरू आहे ? याची माहिती तुम्हाला देऊ. तसेच लवकरात लवकर बँक सुरू होण्याच्या दिशने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. 

पीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे सारंग वाधवान राकेश वाधवान आणि पीएमसीचे माजी अध्यक्ष वरीयम सिंग यांना 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी दिल्याने पीएमसी बँकचे खातेदारांमधील रोष वाढला आहे.