...आणि परिचारिका, वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण

पाहा कुठे घडली ही घटना

Updated: Oct 29, 2020, 07:30 PM IST
...आणि परिचारिका, वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

दहिसर : दहिसरमधील कांदरपाडा येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी कार्यरत असणाऱ्या अतिदक्षता उपचार केंद्रामध्ये, रुग्णाशेजारी वैद्यकीय संयंत्राला लागलेली आग त्याचक्षणी प्रसंगावधान राखून विझवण्याची कामगिरी तेथील परिचारिकांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या दक्षतेबद्दल सर्व स्तरांतून सध्या त्यांचं कौतुक होत आहे. 

महानगरपालिकेकडून संचालित विविध कोरोना केंद्रांमध्ये वैद्यकीय सेवा आणि सुविधा पुरवण्यात येत आहेत. सोबत इतरही आवश्यक सुविधा तसेच सुरक्षेच्या उपाययोजना उपलब्ध असतील, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. या केंद्रांवर नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना अग्नीशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. ज्याचा उपयोग अतिशय मोठ्या संकटाच्या प्रसंगी आल्याचं पाहायला मिळालं. संकटसमयी विचलीत न होता कसा करावा, परिस्थितीशी दोन हात कसे करायचे याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं दहिसरमध्ये. 

दहिसर कांदरपाडा येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी १०० (खाटा) रुग्ण शय्या क्षमता असलेले सुसज्ज असे अतिदक्षता उपचार केंद्र कार्यान्वित असून त्याचे संचालन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. 
सदर केंद्रामध्ये एका रुग्णाशेजारी असलेल्या एचएफएनसी (हाय फ्लो नोझल कॅनूला) संयंत्राने आज (दिनांक २९ ऑक्टोबर २०२०) दुपारी २ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास पेट घेतला. त्यावेळी रुग्णाजवळ असलेल्या परिचारिका अनुपमा तिवारी यांनी क्षणार्धात संयंत्र रुग्ण शय्येपासून दूर केले. संयंत्राचा वीजपुरवठा खंडीत केला. आजूबाजूच्या इतर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी, वॉर्डबॉय जतीन यांच्यासह इतर कर्मचारी यांनी जवळच उपलब्ध असलेले अग्निरोधक उपकरण (fire extinguisher) आणले आणि पेटलेले वैद्यकीय संयंत्र क्षणार्धात विझवले. प्रसंगावधान राखून आग विझवल्याने पुढील दुर्घटना टळली.

 

संकटाच्या या प्रसंगी परिचारिका, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वांनीच त्यांची पाठ थोपटली. शासनदरबारीही त्यांची दखल घेतली गेली. राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना शाबासकी दिली.