कंगना रणौत, बहीण रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Updated: Oct 17, 2020, 01:28 PM IST
कंगना रणौत, बहीण रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश   title=
संग्रहित छाया

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

मुस्लिम असल्याने आपल्याला काम न दिल्याचा आरोप करत, साहिल सय्यद याने वांद्रे न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणीदरम्यान कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर मुंबईचा पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तान असा उल्लेख करतही तिने ट्विट केले होते. त्या प्रकरणीही तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात शहरातील वकिलांनी बुधवारी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. सोशल मीडिया पोस्टद्वारे दोन धार्मिक गटांमधील वैर वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता. 

वांद्रे न्यायालयात कंगनाविरोधात दोघांनी याचिका दाखल केली होती. याचिका करताना म्हटले होते, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवत आहे. कंगना ही अनेकवेळा आक्षेपार्ह ट्विट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान, याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडिओ सादर केले. त्यानंतर न्यायालयाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, त्याआधी याचिकाकर्ता यांने पोलिसात धाव घेतली होती. वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली. 

वादग्रस्त विधानांमुळे कंगना चर्चेत

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडचे ड्रग कनेक्शन बाहेर आल्यानंतर कंगनाने बॉलिवूडमधील ड्रग्जचे सेवन आणि ड्रग्ज तस्करीबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्ज घेतात आणि बॉलिवूडची गटाराशी तुलना केली होती. खासदार जया बच्चन यांनी बॉलिवडूला बदनाम केल्याप्रकरणी संसदेत तिच्या विधानावर आक्षेप घेतला. जया यांनी काही चित्रपट व्यक्तिमत्त्वांवर संसदेत नाव न घेता काही टीका केली होती. हे लज्जास्पद आहे. ते खात असलेल्या प्लेटमध्ये घाण करत आहेत. हे चुकीची आहे, असे म्हटले होते. त्यानंतर  अभिनेत्री कंगना रणौत हिने टीका केली.