वानखेडे कुटुंबियांवरच्या आरोपांची न्यायालयाकडून दखल, नवाब मलिक यांना दिले 'हे' आदेश

समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे

Updated: Nov 8, 2021, 04:00 PM IST
वानखेडे कुटुंबियांवरच्या आरोपांची न्यायालयाकडून दखल, नवाब मलिक यांना दिले 'हे' आदेश title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या कुटुंबावर दररोज नवनवे आरोप करत आहेत. याबाबत समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. तसंच नाहक बदनामी करत असल्याबद्दल सव्वा कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. आज नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) यांच्या बहिणीवर आरोप केला आहे.

नवाब मलिक दररोज सोशल मीडियावरुन वानखेडे कुटुंबियांविरोधात आरोप करत असून सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासापासून त्यांना मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंतही वानखेडे यांच्या वकिलांनी कोर्टात केली आहे. 

ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात केलेल्या दाव्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. वकिल अॅड. अश्रफ शेख यांनी ज्ञानेश्वर वानखेडे यांची बाजू मांडली. यावर न्यायमर्ती एम जे जामदार यांनी नवाब मलिक आणि वानखेडे यांच्याबाबतच्या बातम्या आजकाल प्रसार माध्यमांमध्ये वाचत असल्याचं भाष्य केलं. तसंच नवाब मलिक यांच्या वकिलांना रिप्लाय फाईल केला आहे का? अशी विचारणा केली. 

यावर उत्तर देताना नवाब मलिक यांचे वकील अॅड. अतुल दामले म्हणाले की, आम्हाला एक दिवस आधी नोटीस मिळाली आहे. आम्ही आमचे उत्तर 15 दिवसात दाखल करू असं म्हणत वेळ मागितली. तर जो पर्यंत रिपलाय फाईल होत नाही. तो पर्यंत मलिक यांनी सोशलमिडियावर काहीही पोस्ट करू नये, असा युक्तीवाद वानखेडे यांचे वकिल अॅड. अश्रफ शेख यांनी केला. 

याप्रकरणावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्याची विनंती मलिक यांचे वकिल अॅड. अतुल दामले यांनी कोर्टाला केली. पण याबाबत उद्याच रिप्लाय दाखल करा, असं सांगत न्यायालयाने बुधवारी म्हणजे 10 नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट करण्याबाबत न्यायालयाने नवाब मलिक यांना कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत.