देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. त्यामुळे जगाची कोरोनापासून साखळी तोडण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटाचा सामना करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राजू झंजे. राजू झंजे मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत. आज त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे. पण या वडिलांना त्यांच्या मुलाला घट्ट मिठी देखील मारता येत नाही. त्यामुळे त्यांनी एक अत्यंत भावूक पत्र लिहित मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज तुझा पहिला वाढदिवस... तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.. तुझा पहिला वाढदिवस.. पण बाळा तुला आज फक्त प्रेम आणि शुभेच्छाच देऊ शकतो. लॉकडाउन मुळे सगळे बंद आहे रे .... तुला नवीन कपडे ही नाही घेता येत.... तू अजून खूप लहान आहेस पिल्ल्या... त्यामुळे तुला लॉकडाउन, कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव यातले काही समजणार नाही..... पण बाळा ज्यांना समजतंय ते पण समजून ना समजल्यागत करतायत आणि बिनधास्त कारण नसताना घराबाहेर पडून "करोनाला " आमंत्रण देतायत.........
आरु......मला मात्र रोज घराबाहेर पडावं लागतं.. कामासाठी..... अत्यावश्यक सेवेत आहे ना बाळ मी.. त्यामुळे..... पण जेव्हा कामावरून घरी येत असतोना बाळा मी...... तेव्हा डोकयात नुसतं विचारांचं काहूर माजलेलं असतं... कारण.. रोज कोविड १९ च्या पॉसिटीव्ह रुग्णांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी त्यांच्या एरियात जावं लागतं...... कधी कोविड १९ टेस्टच्या कॅम्प साठी रजिस्ट्रेशन करावं लागतं.... त्यामुळे याआधी तुझ्या ओढीने घराकडे येणारी पाऊले आता थबकतात... घरी यायला भीती वाटते.... पण यावं लागतं. तुझ्यासाठी आणि तुझ्या मम्मी साठी......
घरी आलो की तू जागा असलास तर तुझी धडपड चालू होते.... माझ्याकडे येण्यासाठी.... पण नाही घेऊ शकत मी तुला.. तुला अजून बोलता येत नाही.. पण तुझे डोळे आणि हावभाव खूप काही बोलून जातात या बापाशी.... यासाठी माफ कर.... तुझा वाढदिवस गावी आजी -आजोबांकडे करायचं ठरलं होतं..... पण कर्तव्यामुळे गावी नाही जाता आलं आपल्याला..... बाळ आरव.... सध्या या कोविड १९ ला रोखण्यासाठी बाळा.... संपूर्ण आरोग्य विभाग-पोलीस प्रशासन -सफाई कामगार आप-आपल्या कर्तव्यावर आहेत........
आरव.... माझ्या सारखे असे असंख्य लोकं आपल्या मुलां-बाळापासून घरा-दारापासून दूर राहून किंवा ये जा करून आपलं या कोविड १९ च्या लढ्यात योगदान देत आहेत....... सध्या नोकरीतल्या कर्तव्यामुळे कदाचित एका बापाची कर्तव्य माझ्यापासून राहून जात असतील, पण बाळा.... कोविड १९ चा लढा जेव्हा जिंकू ना तेव्हा मी खूप आनंद साजरा करीन. कारण त्यांनंतर मला तुला जवळ घेता येईल.... तुला मनसोक्त माझ्या अंगा -खांदयावर खेळवता येईल... आणि हो... हा आनंद साजरा करून मी एक "बाप" म्हणून तुझ्या कर्तव्यात हजर होऊन तुझी सर्व कर्तव्य पार पाडीन.. हा शब्द