मुंबई : भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजच्या एका दिवसात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३४० वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ७४ रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २४ झाली आहे.
मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पण कस्तुरबा रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेला पोलीस कोरोना संशयित असल्याची माहिती समोर आली आहे. या पोलिसाला आज सकाळी घशामध्ये खवखव होऊ लागल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासलं. यानंतर डॉक्टरांनी या पोलिसाला संशयित म्हणून दाखल करुन घेतलं आहे. या पोलिसाचे कोरोनाचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत.
भारतामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यातले दोन मृत्यू हे मुंबईत झालेले आहेत. महाराष्ट्रातला कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, सोमवारपासून ३१ तारखेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या कालावधीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. ३१ तारखेपर्यंत रेल्वेदेखील बंद करण्यात आल्या आहेत.