मुंबई : मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच राज्यात कोरोनाचे उपचार करणाऱ्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
आज राज्यात कोरोनाबाधीत ४६६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४,६६६ एवढी झाली आहे. ६५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५७२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३८६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या ७६ हजार टेस्ट झाल्या आहेत, तर एकट्या मुंबईत हा आकडा ५० हजार एवढा आहे. ७५ हजार टेस्ट जलदगतीने करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, कारण आपण सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. आयसीएमआरच्या सूचना राज्य सरकार कटाक्षाने पाळत आहे. घरोघरी जाऊन नागरिकांचं आरोग्य सर्वेक्षण करण्यासाठी ६,३५९ पथकं कार्यरत आहेत, असं टोपे म्हणाले.
राज्याचा कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग मंदावत आहे. सुरूवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे ७ दिवसांवर गेला आहे. हा दर २० ते २५ दिवसांवर आला तर ती समाधानाची बाब असेल, असं वक्तव्य राजेश टोपेंनी केलं.
ज्या जिल्ह्यात १५ हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रोड झोन तर १४ दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि २८ दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे, असं राजेश टोपेंनी सांगितलं.