Corona Return : साताऱ्यात मास्कसक्ती, राज्यातही होणार? महाराष्ट्रात पुन्हा निर्बंधांचं संकट

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. कोरोनाचा वाढता धोका पाहता साताऱ्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातही मास्कसक्ती होणार का? असा सवाल उपस्थित होतोय. 

Updated: Apr 4, 2023, 10:21 PM IST
Corona Return : साताऱ्यात मास्कसक्ती, राज्यातही होणार? महाराष्ट्रात पुन्हा निर्बंधांचं संकट title=

Corona Return : कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढतोय. कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होतीय. मुंबईसह अनेक जिल्ह्यात कोरोना झपाट्यानं पसरतोय. साताऱ्यात नव्या विषाणूनं (New Variant) दोघांचा बळी घेतलाय. खबरदारीचा उपाय म्हणून साताऱ्यात (Satara) पुन्हा एकदा मास्कसक्ती (Mask Mandatory) करण्यात आलीय. जिल्हाधिकारी रूचेश जयवंती यांनी परित्रक काढून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत. 

साताऱ्यात मास्कसक्ती
साताऱ्यात सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये मास्क वापरण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्यात वाढत असलेल्या इन्फ्लुएन्झा आणि कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक पूर्वतयारी आणि उपायोजना राबवण्याविषयी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी हे आदेश दिले. या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. 

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढतेय
राज्यात सध्याच्या घडीला 3500 हून अधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. राज्यात 13 आणि 14 एप्रिल रोजी करोनासाठी मॉकड्रिल घेतलं जाणार आहे. संपूर्ण राज्यात कोविड आढावा घेतला जाणार आहे. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरु आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मात्र ताप, खोकला, सर्दी अंगावर काढू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घ्या. कोरोना असेल तरी 48 ते 72 तासात रुग्ण बरा होतो, असं आरोग्यमंत्र्यांनी यांनी म्हटलं आहे.

दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ
राज्यात गेल्या 24 तासात 711 रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 3 एप्रिलला 250 रुग्ण आढळून आले होते. पण चार एप्रिलला रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालीय. गेल्या दहा दिवसातील राज्यातील रुग्णसंख्या वाढीचा आकडा चिंता वाढवणारा आहे. 

ओमिक्रॉनच्या सबव्हेरिएंटचा धोका
ओमिक्रॉनचा सबव्हेरिएंट XBB.1.16 मुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट उसळलीय. या व्हेरियंटमुळे बुस्टर डोस घेतलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण होतीय. त्यामुळे सावध राहा, कोरोनाची नियम पाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा. नव्या व्हेरियंटला हलक्यात घेण्याची चूक करू नका, नाहीतर पुन्हा निर्बंधांना सामोरं जावं लागेल.