मुंबई : महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षात दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या मविआ नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केले.
आरोपांची मालिका सुरु असतानाच आता काँग्रेसने आज एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी मालेगाव स्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितनं देवेंद्र फडणवीस यांच्याशी हात मिळवण्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मुलीच्या रिसेप्शन प्रसंगी भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
आपल्या ट्विटमध्ये सचिन सावंत यांनी या व्हिडिओला 'बहुत याराना है' असं कॅप्शन दिलं आहे. कर्नल प्रसाद पुरोहित येताच फडणवीस जागेवरुन उभं राहत त्यांच्याशी हस्तांदोलन करत नमस्कार करताना या व्हिडिओत दिसत आहे.
बहुत याराना लगता है। pic.twitter.com/yu5xvphKhn
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 17, 2022
सचिन सावंत यांचं म्हणणं
ज्या घनिष्टतेने आणि ज्या प्रेमाने युएपीएचा आरोपी असलेल्या एका व्यक्तीबरोबर भेट घेतली जाते, त्यातून दिसतं की रिश्ता क्या कहलाता है, बहुत याराना लगता है असं दिसतं यातून असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटाची घटना संपूर्ण देशपातळीवर त्याचा निषेध झाला, त्या घटनेच्या आरोपीबरोबर तुम्हची एवढी घनिष्टता का, असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.
प्रसाद लाड यांनी दिलं उत्तर
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नातील हा व्हिडिओ आहे. यावर बोलताना प्रसाद लाड यांनी बाजू मांडली आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांना मालेगाव प्रकरणात गोवण्यात आलं होतं . न्यायालयाने त्यांना अजुन आरोपी मानलेलं नाही. गुन्हा सिद्ध होईस्तोवर त्यांना आरोपी मानू नये त्यामुळे ते लष्करात पुन्हा रुजू होऊ शकतात, असे न्यायालयाने सांगितले आणि ते सध्या लष्करात आहेत असं सागंत किती ही विकृती, असं उत्तर प्रसाद लाड यांनी दिलं आहे.
सचिन सावंत हे लग्न समारंभात उपस्थित होते, अशा प्रकारे लग्नसमारंभात विकृतीची बुद्धी दाखवण्याचं काम काँग्रेने केलं असल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.