नववीच्या पुस्तकात गांधी कुटुंबियांबाबत आक्षेपार्ह मजकूर, विरोधकांची घोषणाबाजी

नववीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Updated: Aug 2, 2017, 05:58 PM IST
नववीच्या पुस्तकात गांधी कुटुंबियांबाबत आक्षेपार्ह मजकूर, विरोधकांची घोषणाबाजी title=

दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : नववीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंदिरा गांधी आणि राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे विधानसभेमध्ये विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब करण्यात आलं.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचं देशासाठी मोठं योगदान आहे. पण त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला आहे. हा मजकूर ताबडतोब पुस्तकातून वगळण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रपुरुषांचा अवमान झाला आहे त्यामुळे शिक्षण मंडळातील लोकांवर कारवाई झाली पाहिजे, असंही विखे पाटील म्हणाले.

इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचं देशासाठीचं योगदान सगळ्यांना माहिती आहे. राजीव गांधींच्या नेतृत्वात देशात सगळ्यात जास्त खासदार निवडून आले. इंदिरा गांधींकडे पोलादी स्त्री म्हणून बघितलं जातं. या दोन्ही नेत्यांनी चांगली कामं केली पण छापून आलेल्या मजकुरामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं अजित पवार म्हणालेत. हा मजकूर वगळण्याची मागणी अजित पवारांनी केली. तसंच आमच्या काळात अशा चुका झाल्या त्या आम्ही दुरुस्त केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

दरम्यान या सगळ्या प्रकरणावर गिरीश बापट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिक्षण मंडळाला स्वायत्तता आहे. डॉ. सदानंद मोरे हे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. कुणाचा अपमान करणं किंवा मानहानी करणं आम्हाला मान्य नाही, असं गिरीश बापट म्हणालेत. कोणाच्याही भावना दुखावणे किंवा बदनाम करण्याचा सरकारचा उद्देश नसल्याचं बापट म्हणाले. तसंच सरकार योग्य कार्यवाही करतील आणि शिक्षण मंत्री निवेदन देतील, अशी प्रतिक्रिया गिरीश बापट यांनी दिली.