मुंबई: राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आला असताना आता काँग्रेसचे नेते मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले, ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, मुस्लिम समाजातील मागासवर्गीयांनाही पाच टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
काँग्रेस सरकारच्या काळात मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला, याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. मात्र, सरकार मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देणार, हे पाहणेदेखील गरजेचे आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
दुसरीकडे मुस्लिम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाबद्दल सरकार काहीच बोलायला तयार नाही. सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यायचेच नाही, हे ठरवून टाकले आहे का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला.
तर काँग्रेस आमदार नसीम खान यांनीही हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ, सबका विकास अशी घोषणा देतात. प्रत्यक्षात मात्र मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल कोणताही भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे नुसती भाषणं आणि आश्वासनं देऊन काही होणार नाही, असे नसीम खान यांनी सांगितले.