महाराष्ट्रात 'काँग्रेस छोडो यात्रा', अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये 'आदर्श' प्रवेश?

Maharashtra Politics : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आलाय.. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलाय. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.. 

राजीव कासले | Updated: Feb 12, 2024, 05:34 PM IST
महाराष्ट्रात 'काँग्रेस छोडो यात्रा', अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये 'आदर्श' प्रवेश? title=

Maharashta Politics : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप आलाय. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा (Congress) हात सोडलाय. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन आमदारकीचाही राजीनामा दिला. लवकरच ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी (Rajyasaba Election) दिली जाणार असून, पुढच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत कालपर्यंत सक्रीय असलेल्या अशोक चव्हाणांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं काँग्रेसला जबर धक्का बसलाय. मात्र यापेक्षाही आणखी मोठा झटका काँग्रेसला देण्याची तयारी सुरू झालीय. चव्हाणांपाठोपाठ आणखी काही काँग्रेस आमदारही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' सुरु केलं आहे. काँग्रेसमधील मोठा गट फोडण्याची भाजपची खेळी आहे.

अशोक चव्हाणांचं तेव्हाच ठरलं होतं?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि भाजपाशी हातमिळवणी केली. यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. यानंतर विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला जात नसल्याची ओरड झाली. पण अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात मात्र सरकारने भरघोस निधी दिला. इतकंच नाही तर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी सभागृहात महाराष्ट्र विकास आघाडीचे काही आमदार उपस्थित नव्हतें. यात अशोत चव्हाण यांचाही समावेश होता. भाजपाला मदत करण्यासाठीच हे आमदार अनुपस्थित होते अशी चर्चा रंगली. या प्रकाराची काँग्रेस पक्षश्रेष्ठींनीही गंभीर दखल घेतली. तेव्हाच अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा रंगली. इतकंच काय तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील असं भाकीत वर्तवलं होतं.  ही चर्चा अखेर खरी ठरलीय. 

आणखी कोण सोडणार काँग्रेसचा 'हात'? 
माजी मंत्री अमित देशमुख, धीरज देशमुख, सुरेश वरपूडकर, कुणाल पाटील, अमित झनक आणि माधवराव जवळगावकर हे आमदार देखील काँग्रेसला रामराम करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आंहे. अशोक चव्हाणांपाठोपाठ काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी देखील राजीनामा दिलाय. अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या राजीनाम्यानं नांदेड जिल्ह्यात काँग्रेससाठी आणखी एक मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं काही काँग्रेस आमदारांनी स्पष्ट केलंय.

अलिकडेच माजी खासदार मिलिंद देवरा आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आता अशोक चव्हाणांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकला.. येत्या १५ फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची सभा छत्रपती संभाजीनगरात होणारय. या सभेत मराठवाड्यातील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. नाना पटोलेंच्या कारभाराला कंटाळून काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलाय. नाना पटोलेंवर अनेक नेते नाराज आहेत त्यामुळे नाना पटोलेंच्या कार्यकाळात काँग्रेस नामशेष होईल असही देशमुखांनी म्हंटलंय. 

एकीकडं राहुल गांधी भारत जोडो यात्रेत पायी चालत काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतायत. तर दुसरीकडं महाराष्ट्रात मात्र नेत्यांची काँग्रेस छोडो यात्रा सुरू झालीय.. लोकसभा निवडणुकीआधी पक्षातली गळती थांबवण्याचं आव्हान काँग्रेसपुढं असणाराय.