दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका; मोठ्या निर्णयांची शक्यता

दोन्ही पक्षांकडून संघटनात्मक पातळीवर मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

Updated: Jun 1, 2019, 10:46 AM IST
दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठका; मोठ्या निर्णयांची शक्यता title=

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपापल्या नेत्यांना महत्त्वपूर्ण बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये दोन्ही पक्षांकडून संघटनात्मक पातळीवर मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळाचे त्याकडे लक्ष लागले आहे. 

यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुकाणू समितीची (कोअर कमिटी) बैठक मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होईल. सकाळी दहा वाजता शरद पवार सुकाणू समितीमधील सदस्यांशी संवाद साधतील. यावेळी ते लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेतील. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची काय रणनीती असावी, यावरही चर्चा केली जाईल. यानंतर दुपारी दोन वाजता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते व कार्यकारिणीतील लोकांशी संवाद साधतील. 

शरद पवार भाकरी फिरवण्याच्या विचारात, विधानसभा निवडणुकीची तयारी

तर दिल्लीत आज सकाळी काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांची पहिली बैठक होणार आहे. यावेळी काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. या बैठकीला काँग्रेसचे राज्यसभेतील खासदारही उपस्थित असतील. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र, राष्ट्रीय कार्यकारिणीने राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावला होता. यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. 

गेल्या दोन दिवसांमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. यानंतर शरद पवार राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचारात असल्याची चर्चा आहे. जेणेकरून एकत्रित संख्याबळाच्या आधारे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या पदरात पडेल. तसेच या पदासाठी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे केल्याचीही चर्चा दिल्लीमध्ये रंगली आहे.