छत्रपतींच्या वंशजांना शिवरायांची मोदींशी तुलना मान्य आहे का; राऊतांचा सवाल

निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका सपष्ट करावी.

Updated: Jan 12, 2020, 07:04 PM IST
छत्रपतींच्या वंशजांना शिवरायांची मोदींशी तुलना मान्य आहे का; राऊतांचा सवाल title=

मुंबई: भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या वादात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली. संजय राऊत यांनी ट्विट करत थेट छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले यांना या वादात खेचले आहे. मोदींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना करणे सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का, असा सवाल राऊतांनी विचारला आहे. 

यापैकी छत्रपती संभाजीराजे यांनी काहीवेळापूर्वीच सिंदखेडराजा येथील सभेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नरेंद्र मोदी हे त्यांच्याठिकाणी मोठे नेते आहेत. ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांचीच काय इतर कोणाचीही तुलना केली जाऊ शकत नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले. 
त्यामुळे आता नव्यानेच भाजपवासी झालेले उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

याशिवाय, राऊत यांनी 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्यावरही आसूड ओढले आहेत. गोयल यांनी महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी  माणसाला शिव्या घातल्या होत्या. यानंतर शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती, अशी माहिती राऊत यांनी ट्विटमध्ये दिली आहेत. 

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करण्यात काहीही गैर नाही- श्याम जाजू

तसेच राऊत यांनी या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका सपष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज...छत्रपती शिवाजी महाराज, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

'मोदी मोठे नेते, पण शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही'