मुंबई : राज्यातील शेतीमालाचे मूल्यवर्धन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना भारतीय रेल्वेचे सहकार्य देऊ केलेय. नाशिकमधील लासलगाव येथे रेल्वे आणि खरेदी विक्री संघाच्या संयुक्त प्रयत्नातून ओनियन कोल्ड स्टोरेज उभारण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० जुलैला त्याचे भूमीपूजन होत आहे.राज्यातील अशा स्वरुपाचे हे पहिलेच कोल्ड स्टोरेज उभे राहणार आहे. लासलगाव ही देशातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या परिसरात विविध फळ पिकांचे उत्पादनही लक्षणीय प्रमाणात होत असते. येथील खरेदी विक्री संघ आणि रेल्वे मंत्रालयाचे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात या स्टोरेजच्या उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात येत आहे.
त्यानुसार लासलगाव खरेदी विक्री संघाकडून कंटेनर कॉर्पोरेशनला जवळपास सात एकर जागा देण्यात येत आहे. या जागेच्या काही भागावर कोल्ड स्टोरेज उभारण्यात येईल. याच जागेवर संघाची एकूण दोन हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेची दोन वेअर हाऊस आहेत. त्याचीही या प्रकल्पाला मदत होणार आहे.
रेल्वेकडून सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून (सीएसआर) पाच कोटींची मदत करण्यात आली आहे. गरज भासल्यास अधिकचा निधीही देण्याची तयारी रेल्वेने दर्शविली आहे. या कोल्ड स्टोरेजची क्षमता दोन हजार मेट्रिक टनांहून अधिक असेल. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळ बागायतदारांचीही मोठी सोय होणार आहे.