भाजपसोबत युती का तुटली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक प्रतिक्रिया

Updated: Feb 3, 2020, 10:35 AM IST
भाजपसोबत युती का तुटली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक मुलाखत घेतली. यात अनेक प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. भाजपसोबत युती का तुटली यावर ही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'बाळासाहेबांना अनेकांनी धक्के देण्याचा प्रयत्न करुन पाहिले. ते त्यांना जमले नाही. शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना धक्के दिले ते अजून सावरलेले नाहीत. बुद्धीबळ हा बुद्धीने खेळायचा खेळ आहे. पण चाली जर लक्षात घेतल्या तर मला नाही वाटत बुद्धीबळ खेळणं कठीण आहे.'

'मुख्यमंत्रीपद स्विकारणं हे माझं स्वप्न कधीच नव्हतं. वचन देणं आणि वचन निभावणं, वचन का मोडलं गेलं. वचन मोडल्यानंतर दुसरा पर्याय नव्हता. भाजप सावरला आहे का मला माहित नाही. वचन पाळलं असतं तर काय गेलं असतं. मी कुठे आकाशातील चांद-तारे मागितले होते. मी तर लोकसभा निवडणुकीच्या आधी जे ठरलं होतं ते मागितलं होतं.'

'शिवसेनाप्रमुखांनी कधी सत्तेचं पद स्विकारलं नाही. माझी पण इच्छा नव्हती. पण ज्यांच्यासोबत होतो. त्यांच्यासोबत राहुन मी त्या दिशेने जावू शकत नाही. वेगळी दिशा स्विकारायची असेल तर त्यापुढे नाईलाज होता.'

'जे करायचं ते दिलखुलासपणे करायचं. अमित शाह आले. संबंध सुधारत असतील तर नवीन सुरवात करायला काय हरकत आहे. असा विचार केला होता. माझ्या मनात काहीही नव्हतं. लोकसभेतही युतीचा प्रचार केला. विधानसभेच्या निवडणुकीतही हिंदुत्वासाठी युती टिकवली. माझ्य़ाकडून नातं टिकवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना ही भूमिपुत्रासाठी जन्माली आली. नंतर हिंदुत्व स्विकारलं. भाजपसोबत एकत्र आलो. आजही हिंदुत्वाबाबत आमची भूमिका तीच आहे.'