मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लवकरच चैत्यभूमीवर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसैनिकांची मांदियाळी आहे. राजकीय नेतेमंडळीही आज चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. 

Updated: Dec 6, 2019, 07:40 AM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लवकरच चैत्यभूमीवर title=

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसैनिकांची मांदियाळी आहे. राजकीय नेतेमंडळीही आज चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. सकाळी ७.४५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत आहेत. त्याचबरोबर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आज सकाळी बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत. विरोधात बसलेल्या भाजपचे नेतेही आज चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणार आहेत.

शोषित पीडितांना जगण्याचं आत्मभान देणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर हजारो भीमसैनिक दाखल झाले आहेत. शिवाजी पार्कवर जणू भीमसागर उसळल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून शिवाजी पार्कवर सर्व सोयी -सुविधा देण्यात आल्या आहेत. ३ डिसेंबरपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊ लागले. यंदा चैत्यभूमीवर गर्दीचा उच्चांक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

कालपासूनच शिवाजी पार्क परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. आंबेडकरी गायक, कलावंत भीमगीतं गाऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करत आहेत. कविसंमेलनांमधूनही महामानवाला अभिवादन केलं जात आहे.