मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडीवरून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. अशातच राज्यपाल कोश्यारी यांनी अध्यक्ष निवडीबाबत सरकारने पाठविलेला प्रस्ताव फेटाळून लावला आहे. यावरून सत्ताधाऱ्यानी निवडणूक घेण्याची ठाम भूमिका घेतली आहे.
विधानसभा अध्यक्ष यांच्या निवडणुकीसाठी आघाडी सरकारने नियमात बदल केले आहेत. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आला. मात्र, या प्रस्तावाला राज्यपालांनी नकार दिला आहे. हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळविले आहे.
मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र
राज्यपालांनी हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना एक पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यांनी राज्य सरकारने पाठविलेल्या पत्राला संध्याकाळपर्यंत मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.
तसंच, विधिमंडळातील कायदे घटनेनुसार आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाही. कायदे मंडळाने काय कायदे केले ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही. सरकारने केलेल्या कायद्याबाबत अविश्वास दाखवला याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधिमंडळाचे कायदे राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येत नाहीत. निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम आहे. यात आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच येत नाही असं सांगण्यात आलं आहे. तसंच, राज्यपाल महोदयांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये. हि बाब कायदेशीर आहे की नाही हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी या पत्रातून राज्यपालांना दिला आहे.