मुंबई: महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नेमकी कधी साजरी करायची, यावरून महाविकासआघाडीत सुरु असलेला गोंधळ आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा सुवर्णमध्ये निघाल्याचे समजते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे तारखेनुसार म्हणजे १९ फेब्रुवारीला येणाऱ्या शिवजयंतीवेळी शासनातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. तर शिवसेना पक्ष पूर्वीप्रमाणेच तिथीनुसार शिवजयंती साजरी करेल.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यामुळे हे सरकार आता नेमक्या कोणत्या तारखेला शिवजयंती साजरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात येते. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून तारखेनुसार जयंती साजरी करण्यात येते. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचाही प्रयत्न केला होता.
शिवसेनेची भूमिका काँग्रेसला छेद देणारी, मुख्यमंत्र्यांचे एका दगडात तीन पक्षी!
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये शिवजयंती एकाच दिवशी साजरी करण्याबाबत खल सुरु होता. तुर्तास सरकारी तारखेनुसारच शिवजयंती साजरी करायचे ठरले आहे. मात्र, भविष्यात शिवजयंतीची एक तारीख निश्चित करण्यासाठी सरकार समिती नेमणार असल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी कालच शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी करा, असे ट्विट केले होते. तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करा. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.
तर ठाकरे घराण्याशी हाडवैर असलेल्या नितेश राणे यांनीही कधी नव्हे ते एकाच दिवशी शिवजयंती साजरी करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे किमान आता तरी शिवजयंतीचा वाद संपला पाहिजे. एक शिवप्रेमी म्हणून मी तुमच्यासोबत आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.