मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी' या चित्रपटाचा गाजावाजा केल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया, कलाविश्व आणि चाहत्यांच्या वर्तुळात सुरु आहे. याच चित्रपटाच्या एका खास स्क्रिनिंगसाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'वाईल्ड मुंबई' या फोटोग्राफीक फिल्मचं अनावरण करण्यात येणार आहे. मंगळवारी या सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे. मुंबईतील दादर येथे असणाऱ्या प्लाझा सिनेमा या चित्रपटगृहात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
फोटोग्राफिक फिल्मच्या अनावरणानंतर कंत्राटदार आणि पालिकेच्या काही अधिकाऱ्यांसाठी 'तान्हाजी' या चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं आहे. महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी एक पत्र पाठवत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना या स्क्रीनिंगसाठी उपस्थित राहण्याची विचारणा केली आहे. फक्त पालिका अधिकारी आणि मुख्यमंत्रीच नव्हे, तर या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगन हासुद्धा या स्क्रीनिंगसाठी हजर राहणार आहे. त्यामुळे ही स्क्रीनिंग अतिशय खास ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'तान्हाजी' या चित्रपटाने आठवड्याभरातच दमदार कमाई केली. दीपिका पदुकोणच्या 'छपाक' या चित्रपटाचं तगडं आव्हान पेलत बॉक्स ऑफिसचा गड 'तान्हाजी'ने राखला असंच म्हणायला हरकत नाही.
अजय देवगन, काजोल, शरद केळकर, ्सैफ अली खान, देवदत्त नागे अशा अनेक कलाकारांनी एकत्र येत सादर केलेली 'तान्हाजी' ही कलाकृती इतिहासातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकत असून, एक शौर्यगाथा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळत आहे.