मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई महापालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवकांची बैठक

Updated: Dec 26, 2019, 04:11 PM IST
मुख्यमंत्र्यांनी बोलवली मुंबईतील शिवसेना नगरसेवकांची बैठक title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई महापालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. प्रभागात राज्य सरकारशी निगडीत रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचं कळतं आहे. आज ४ वाजता ही बैठक सुरु होणार आहे. बैठकीला मंत्रालयातील संबंधित अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेसाठी मुंबई महापालिका ही नेहमीच अस्तित्वाचा भाग राहिली आहे. मुंबई महापालिकेत अनेक कामं ही रखडली आहेत. अनेक प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून मुंबई महापालिकेला अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे नगरसेवकांच्या अनेक मागण्या या प्रलंबितच राहतात. 

मुंबई महापालिकेतील मालमत्ता करमाफी, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे, विकास आराखडय़ातील नगरसेवकांच्या सूचना मान्य करणे, जल विद्युत केंद्राच्या निर्मितीसाठीच्या परवानगी, कचराभूमीसाठी भूखंड अशा अनेक महत्त्वाचे निर्णय़ मुख्यमंत्र्यांकडून होत असतात. पण आता शिवसेनेचेच मुख्यमंत्री असल्यामुळे या कामांना गती मिळते का हे पाहावं लागणार आहे.  

मुंबई महापालिकेवर शिवसेनेची २२ वर्षांपासून सत्ता आहे. पण राज्यात सत्ता खूप कमी वेळा हातात आल्यामुळे शिवसेनेला अनेक कामं करता आली नाहीत. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणकोणते कामं निकाली काढतात हे पाहावं लागणार आहे.