अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्र्यांनी वर्षा या आपल्या मुंबईतील निवासस्थानी राज्यातील मराठा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षण संदर्भात ही बैठक असल्याचं सांगण्यात येत आहे. या बैठकीच मराठा मंत्र्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. ही बैठक आज रात्री उशीरा होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ही बैठक होणार आहे.
'डॅमेज कंट्रोल' करण्याकरीता सरकारकडून ही पावलं उचलली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. यात राज्यसरकारचे सध्याचे मराठा मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुभाष देशमुख हे उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह आणखी किंवा कुणी उपस्थित राहणार आहेत का हा देखील एक मुद्दा आहे.
मराठा मोर्चाच्या समन्वयकांशी चर्चा करण्यासाठी काय रणनिती आखायची तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात पेटलेलं वातावरण कसं शांत करता येईल यावर मुख्यमंत्री सर्वांशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने, मराठा आरक्षणासाठी नदीत उडी मारली, यात काकासाहेब यांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यात दुसऱ्या दिवशी याच्या निषेधार्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी कडकडीत बंद पुकारण्यात आला, यानंतर आणखी तिसऱ्या दिवशी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवलीतही बंद पुकारण्यात आला. या दोन दिवसात राज्यात काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या, तर काही ठिकाणी एसटी बसंचही नुकसान झालं.
मुंबईतील बंद दुपारी मराठा मोर्चा समन्वयकांनी मागे घेतला, कारण बाहेरच्या लोकांकडून आंदोलन अधिक अग्र करण्याचा घाट घातला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतरही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठा युवकांमध्ये आरक्षणाच्या मागणीची धग संपताना दिसत नाहीय. आगामी काळात सरकारला हा रोष परवडणारा नसल्याचं सांगण्यात येत आहे, म्हणून सरकारकडून यावर उपाय काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.