सत्तासंघर्षाच्या गदारोळात एकटे पडलेले फडणवीस

शिवसेनेकडून रोज शब्दांच्या तोफा, पण फडणवीसांकडे कोणीच नाही

Updated: Nov 2, 2019, 11:31 PM IST
सत्तासंघर्षाच्या गदारोळात एकटे पडलेले फडणवीस title=

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ९ दिवसांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरीही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला नाही. सत्तासंघर्षाच्या या गदारोळात मुख्यमंत्री एकटे पडलेत. शिवसेनेकडून रोज शब्दाच्या तोफांचा मारा सुरू असताना, तो परतवायला फडणवीसांकडे कुणीच नाही.

मै और मेरी तनहाई.... आज कल ये बाते करते है.... की निकाल जरा चांगला लागला असता तर.... थोड्या आणखी जागा आल्या असत्या तर..... शिवसेनेच्या जागा थोड्या कमी झाल्या असत्या तर.... त्या दिवशी साताऱ्यात पाऊस आला नसता तर..... 'वर्षा'च्या खिडकीबाहेर बघत देवेंद्र फडणवीस हाच विचार करत असतील.

सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी परिस्थिती. आधीच १२२ चे १०५ झाले, याची चिंता, नाही म्हटलं तरी दिल्लीची थोडी नाराजी असं सगळं असताना शिवसेना जाम खिंडीत पकडतेय. राऊत रोज बोल बोल बोलतायत... भाजपाकडून बोलणारे मात्र गायब झालेत. फडणवीसांचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या हनुमान गिरीश महाजनांचंही हल्ली दर्शन होत नाही. त्यातच घरच्यांनीच आता आहेर द्यायला सुरुवात केली आहे.

सरसकट अतिवृष्टीची नुकसानभरपाई द्यावी. लोकांच्या रांगा आणि अस्वस्थता शांत करण्यासाठी आश्वस्त करणारे शब्द आवश्यक आहेत. अधिकारी आणि बँक यांना कडक सूचना आवश्यक आहेत, असं ट्विट पंकजा मुंडेंनी केलंय.

मुख्यमंत्री एकाकी असताना विरोधकांनी त्यावरही चिमटा काढण्याची संधी सोडलेली नाही. खरं तर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. हा विजय असला तरी तो  भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग सुकर करत नाही. यशाला अनेक धनी असतात. पण पराभवाला एकच बाप असतो. य़श मिळूनही ते 'बापपण' सध्या फडणवीस अनुभवत आहेत.