राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी बीडीडी चाळ प्रकल्पाला (BDD Chawl Redevelopment) गेल्या काही दिवसांत गती मिळाली आहे. मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव इथल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडातर्फे केला जात आहे.
बीडीडी चाळीतील 2250 पोलिसांना हक्काचा निवारा मिळणार आहे. मात्र पोलिसांना देण्यात येणाऱ्या खोल्यांच्या किमतीवरुनही सध्या चर्चा सुरु आहे. 25 लाखांना ही घरे मिळणार असल्याची माहिती महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले आहे.
त्यातच आता पावसाळी अधिवेशनात बीडीडी चाळीमध्ये पोलिसांना नाममात्र दरात घरे देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर गुरुवारी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घराची किंमतच जाहीर केली आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकासात पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत घोषणा केली. "पोलिसांना घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यात आणखी काही चांगले निर्णय घेता येतील का हेदेखील आम्ही पाहणार आहोत," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंगे म्हणाले.