मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील ७० अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. मंत्रालयातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर चिटकून आहेत. या 'चिकट' अधिकाऱ्यांना नेमकेपणाने हेरून मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा हा बडगा उगारला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सफाई मोहीमेतंर्गत आतापर्यंत ७० अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत.
हे अधिकारी गेल्या सात-आठ वर्षांपासून ‘मलईदार’ मानल्या जाणाऱ्या विभागात ठाण मांडून बसले होते. इतका दीर्घकाळ एकाच ठिकाणी राहिल्यामुळे साहजिकच हे सर्वजण जास्त रुळलेले आणि सैलावलेले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कारवाईने त्यांना मोठा झटका बसला आहे.
अधिकाऱ्याची एका विभागात सहा वर्षे सेवा झाली की, दुसऱ्या विभागात बदली करण्याचा नियम आहे. त्यातही एका विभागात एका कार्यासनात तीन वर्षेच काम करता येते. परंतु गेल्या काही वर्षांत अनेक निवडक अधिकारी एका विभागाच्या बाहेरच पडलेले नाहीत, असे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी ७० अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश काढण्यात आले. त्यात कक्ष अधिकारी ४४, अवर सचिव ११ आणि १४ उपसचिव व सहसचिवांचा समावेश आहे.