दोन राजकीय शत्रूंच्या घरी मुख्यमंत्री एकाच दिवशी पोहचतात तेव्हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात एकमेकांचे शत्रू असलेल्यांच्या घरी एकाचवेळी जाऊन गणपती दर्शन घेत राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला. 

Updated: Aug 26, 2017, 11:58 AM IST
दोन राजकीय शत्रूंच्या घरी मुख्यमंत्री एकाच दिवशी पोहचतात तेव्हा...  title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात एकमेकांचे शत्रू असलेल्यांच्या घरी एकाचवेळी जाऊन गणपती दर्शन घेत राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला. 

शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यानी, नारायण राणे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं.

काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे आता फक्त तांत्रिकदृष्ट्याच पक्षात आहेत. राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे भाकीत वर्तवले जातंय. ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरवण्याच्या हालचालीही जोरात सुरू आहेत. अशा वातावरणात मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी गणपती दर्शनाच्या निमित्तानं गेले होते. यावेळी सुमारे तासभर दोन्ही नेत्यांमध्ये कौटुंबिक आणि राजकीय चर्चाही झाली.

उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत येत आहेत. यावेळी राणे शाहंची भेट घेण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मित्र पक्ष शिवसेना दुखावला जाऊ नये, याची काळजीही मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे राणेंच्या घरून निघाल्यावर मुख्यमंत्र्यानी मिलिंद नार्वेकर यांच्या वांद्रे पाली हिल इथल्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं.