स्टेशन, बाजार, उद्यानं सर्वकाही जवळ; दसऱ्याच्या मुहूर्तावर CIDCO ची बंपर लॉटरी, कोण ठरणार लाभार्थी?

CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी सिडको आणि म्हाडाच्या सोडती बरीच मदत करतात. अशीच सोडत अवघ्या काही दिवसांत सर्वांचं लक्ष वेधणार आहे.   

सायली पाटील | Updated: Sep 20, 2024, 08:40 AM IST
स्टेशन, बाजार, उद्यानं सर्वकाही जवळ; दसऱ्याच्या मुहूर्तावर CIDCO  ची बंपर लॉटरी, कोण ठरणार लाभार्थी?  title=
CIDCO Lottery 2024 navi mumbai latest update news date Application form

CIDCO Lottery 2024 : मागील काही वर्षांमध्ये (Navi Mumbai) नवी मुंबईचा झालेला विकास पाहता इथं घर घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. नवी मुंबईमध्ये घर घेणं काहींच्या अवाक्याबाहेरची बाबही ठरली. अशाच अनेकांच्या मदतीना धावून आली आहे CIDCO. 

इथं म्हाडाच्या (MHADA Lottery) सोडतीमध्ये अर्ज दाखल करण्याची मुदत संपत असतानाच तिथं अनेकांनाच उत्सुकता लागली आहे ती म्हणजे सिडकोच्या आगामी सोडतीची. नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या घरांसाठीची सोडत दसऱ्याच्या मुहूर्तावर निघणार आहे. तब्बल 40 हजार घरांसाठी ही सोडत निघणार असून, यामध्ये वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ आणि खांदेश्वर इथं असणाऱ्या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. 

नवी मुंबईत अगदी मोक्याच्या ठिकाणी अर्थात रेल्वे स्थानकापाशी 40 हजार घरांची ही सोडत असून, हक्काच्या घरासाठी धडपड करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. कोणत्या मजल्यावर घर हवं याची मुभाही या सोडतीमध्ये देण्यात येणार असून, आता या सोडतीत लाभार्थी कोण कोण ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 

हेसुद्धा वाचा : Mhada Lottery 2024: उरले फक्त काही तास! मुंबईत हक्काचे घर मिळवण्यासाठी आज दुपारी 12 पर्यंतचाच वेळ

 

आश्चर्याची बाब म्हणजे सिडकोच्या वतीनं यंदा जारी केली जाणारी सोडत ही तुलनेनं मोठी असून, कैक वर्षांपासून सोडतीमध्ये घर लागण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना इथं प्राधान्य मिळू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे स्थानकानजीक असणाऱ्या घरांसोबतच उद्यानं, बाजार, रुग्णालयं अशा सर्वज गोष्टी हाकेच्या अंतरावर असल्यामुळं आणि इतरही सुविधा सहज उपलब्ध असल्यामुळं या सोडतीची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. 

सिडकोच्या या सोडतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या घरांच्या किमती नेमक्या किती असतील किंवा ही घरं किती मोठी असतील यासंदर्भातील सविस्तर माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण या सोडतीसाठी मिळणारा प्रतिसाद तुलनेनं जास्तच असेल असा कयास आतापासूनच लावला जात आहे.  अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सोडतीसाठी आता अनामत रकमेपासून कागदपत्रांची जुळवाजुळव करेपर्यंतची तयारीसुद्धा अनेकांनीच सुरू केली आहे. तेव्हा आता या सोडतीची सविस्तर माहिती कधी समोर येते आणि सोडतीत घराची लॉटरी कोणाला लागते यावर सर्वांचं लक्ष असेल हे खरं.