CIDCO lottery 2024 : यंदाच्या वर्षी (MHADA lottery) म्हाडा आणि सिडको या संस्थांनी गृहयोजनांचा धडाका लावला असून म्हाडामागोमाग आता सिडकोच्या सोडतीनं इच्छुकांचं लक्ष वेधलं आहे. 7 ऑक्टोबर रोजी सिडकोच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या योजनेचा शुभारंभ होणार असून, या योजनेमध्ये सर्व उत्पन्न गटातील अर्जदारांच्या अनुषंगानं विशेष सवलतीही सिडकोच्या वतीनं देण्यात येणार आहेत.
प्राथमिक माहितीनुसार सध्या सिडकोच्या या सोडतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या घरांचं बांधकाम सुरु असून, काही ठिकाणी हे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. त्यातच एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे सिडकोच्या घरांच्या किमतीची. CIDCO lottery 2024 तील घरांमध्ये, प्रामुख्यानं वरील मजल्यांवरील घरांसाठी विजेत्यांना जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. थोडक्यात सोडतीमध्ये मजल्यानुसार घरांच्या किमती आकारल्या जातील.
सिडकोच्या वतीनं संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळाली असून, त्यामुळं आता पुन्हा एकदा अनेकांचं आर्थिक गणित गडबडताना दिसेल असं म्हणणं गैर ठरणार नाही. सिडकोची यंदाची सोडत मोठी असून, यामध्ये 27 विविध ठिकाणी 67 हजार घरं बांधण्याचं काम सुरू आहे. यापैकी 26 हजार घरांची सोडत ऑक्टोबर महिन्याच्या 7 तारखेला निघणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे, मात्र इथं किमतींमध्ये फरक स्पष्टपणे दिसून येईल.
सिडकोच्या 22 मजली इमारतींमध्ये मजल्यानुसार दर निर्धारित केले जाणार असून, सातव्या मजल्यावरील घरासाठी प्रति चौरस फूट 10 रुपये जास्तीची रक्कम आकारली जाणार आहे. त्यापुढे म्हणजेच 7 व्या मजल्याच्या वरील मजल्यांसाठी दहाच्या पटीनं म्हणजेच 20,30,40 अशा दरानं प्रति चौरस फुटप्रमाणं वाढीव रक्कम आकारली जाईल.
सिडकोच्या यंदाच्या सोडतीतील 50 टक्के घरं तळोजा नोडमध्ये असून, यामध्ये खांदेश्वर, मानसरोवर, खारकोपर आणि बामणडोंगरी या भागातील सिडकोच्याच सोडतीतील शिल्लक घरांचाही इथं समावेश आहे. जुईनगर, वाशी, खारघर येथील घरांचा या योजनेत समावेश नाही.