'चौकीदार चोर है' घोषणेमुळे राहुल गांधी अडचणीत

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानांचा उल्लेख आपल्या भाषणात 'चौकीदार' असाच करताना दिसत आहेत

Updated: Mar 14, 2019, 10:10 AM IST
'चौकीदार चोर है' घोषणेमुळे राहुल गांधी अडचणीत title=

मुंबई : 'चौकीदार चोर है' या घोषणांमुळे भावना दुखावल्याचा आरोप करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाण्यात ही लेखी तक्रार दाखल करण्यात आलीय. मुंबईतील सभेत राहुल गांधींनी 'चौकीदार चोर है' असं वक्तव्य केलं होतं. 

याच वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलीय. 'महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन'तर्फे ही तक्रार करण्यात आलीय. 'चौकीदार चोर है' या घोषणेमुळे सुरक्षा रक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष संदिप घुगे यांनी केलाय. या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आलीय. 

पंतप्रधान मोदी यांनी स्वत:ला देशाचा 'चौकीदार' असं संबोधलं होतं. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानांचा उल्लेख आपल्या भाषणात 'चौकीदार' असाच करताना दिसत आहेत. 'मोदी सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाहीत मात्र, काही बड्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात. मोदी हे चौकीदार नाही तर भागीदार आहेत' असं म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधानांवर लोकसभेतही शाब्दिक हल्ला केला होता.