मुंबई : आपण दुसऱ्यांच्या मुलांचे हट्ट पुरवत नाही. केवळ आपल्या कुटुंबातील मुलांचे हट्ट पुरवण्याचा आपल्याला अधिकार असल्याचं विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यावर 'आम्ही आपल्या मुलांसह इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो. त्यांना धुणी भांडी करण्यासाठी ठेवत नाही' असा टोला उद्धव ठाकरेंनी पवारांना लगावलाय. ते मुंबईत बोलत होते. भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या तारखा जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय. राष्ट्रवादीने अहमदनगरची जागा आपल्या मुलासाठी सोडावी, असा आग्रह राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीकडे केला होता. पण राष्ट्रवादीने ही मागणी फेटाळली होती. त्यानंतर सुजय विखे यांनी भाजपचा रस्ता धरला. त्यावर प्रतिक्रिया नोंदवताना 'माझ्या घरातील मुलाचे हट्ट मी पुरवू शकतो. पण दुसऱ्याच्या घरातील मुलाचे हट्ट मी कसे पुरवू शकतो... त्यांचा हट्ट त्यांच्या वडिलांनी पुरवायला पाहिजे' असं शरद पवारांनी म्हटलं होतं.
तसंच, राजकारणात शरद पवार हे मोठे नेते आहेत. पण ते ज्योतिषी कधी झाले माहिती नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत या पवारांच्या वक्तव्याचा त्यांनी यावेळी समाचार घेतला.