मुंबई : नक्षलवादी असल्याच्या संशयावरून विचारवंत आणि साहित्यिकांनी केलेल्या अटकेवरुन पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यायला लावली, असा आरोप करतानाच त्यांना बडतर्फ करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर अशाप्रकारे पत्रकार परिषदेत पुरावे सादर करून पोलिसांनी न्यायालयाचा अवमान केलाय, अशा आशयाची याचिका करत, या पोलिसांच्या बडतर्फीची मागणी नितीन सातपुते यांनी केली आहे.
दरम्यान, परमवीर सिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण सामाजिक कार्यकर्ते संजीव भालेराव यांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. राज्याचे अतिरीक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी ३१ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या पाचही सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंतांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला होता.
दरम्यान, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांच्या या पत्रकार परिषदेवर टीका केली होती. हे प्रकरण न्यायालयात असताना पोलीस पत्रकार परिषद कशी काय घेऊ शकतात, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला गेला होता.
दरम्यान, परमवीर सिंग गोपनीय पुरावे पत्रकार परिषदेत दाखविणे आणि न्यायालयाचा अवमान करणे याबद्दल परमवीर सिंग यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात परमवीर सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजीव भालेराव यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.