मुख्यमंत्री कार्यालयात रवींद्र वायकरांच्या नियुक्तीसाठी हालचाली, शिवसेनेत मात्र नाराजी

आमदारांशी समन्वय ठेवण्यासाठी वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती करण्याची शक्यता.

Updated: Aug 10, 2020, 06:16 PM IST
मुख्यमंत्री कार्यालयात रवींद्र वायकरांच्या नियुक्तीसाठी हालचाली, शिवसेनेत मात्र नाराजी title=

दीपक भातुसे, मुंबई : रवींद्र वायकर यांची पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं देखील समोर आलं आहे. आमदारांशी समन्वय ठेवण्यासाठी वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आपली कामं होत नसल्याची शिवसेना आमदारांची तक्रार असल्याने वायकर यांची नियुक्ती करण्याबाबत हालचाली सुरु आहेत.

आपले महत्व कमी होईल म्हणून गटनेते एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू मात्र यावर नाराज असल्याचं कळतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वायकर यांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या आमदारांचा एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याशी संपर्क कमी येईल म्हणून नाराजी असल्याची चर्चा आहे.

रवींद्र वायकर मातोश्रीच्या अगदी जवळचे असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्याच्या पुन्हा हालचाली सुरु असल्याचं सुत्रांची माहिती आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जारी केले होते. मात्र लाभाचे पद असल्याचा आरोप झाल्याने वायकर यांनी हे पद स्वीकारलं नव्हतं. पण आता पुन्हा एकदा यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.