Platfrom Ticket Price Hike : सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री, रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

चेन पुलिंगच्या वाढत्या घटना व प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने ही दरवाढ केली आहे. 

Updated: May 9, 2022, 06:12 PM IST
Platfrom Ticket Price Hike : सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री, रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ  title=

मुंबई : मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात मोठी वाढ केली आहे. चेन पुलिंगच्या वाढत्या घटना व प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रेल्वेने ही दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मध्य रेल्वेने काही मोजक्याच स्थानकांसाठी ही नियमावली लागू केली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सूतार यांनी ट्विट करून दिली. रेल्वेच्या या निर्णयावर प्रवासी संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. 
   
मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकात चेन पुलिंगच्या घटना वाढल्या आहेत. साधारण एप्रिल महिन्यात ३३२ चेन पुलिंगच्या घटना घडल्या होत्या. याचा परिणाम एक्सप्रेस आणि लोकल वाहतूकीवर होताना दिसत होता.

तसेच रेल्वेला देखील यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. रेल्वे स्थानकात विनाकारण फिरणाऱ्या प्रवाशांची गर्दी देखील वाढली होती. अशा घटना रोखता याव्या यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. 

मध्य रेल्वेने आज 9 मे पासून प्लॅटफॉर्म तिकीटाचे दरात वाढ केली आहे. 10 रूपये असणारे प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रूपये केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे या स्थानकांसाठी हे दर लागू असणार आहेत. ही दर वाढ येत्या 25 मे पर्यंत लागू असणार आहे. 

 या दर वाढीचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. हे दर कमी झाले पाहिजे अशी मागणी यावेळी प्रवाशांसोबत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर देशमुख यांनी यावेळी केली.

ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत जास्तीत जास्त नागरिक गावी जात असतात, यामुळे रेल्वेवस्थानक परिसरात गर्दी होतेचं. त्यामुळे ही केलेली तिकीट वाढ चुकीची असल्याचे अनेक प्रवाशांचे म्हणणे आहे.