मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली; गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने

मध्य रेल्वेकडून स्थानकांवर याबाबत कोणती उद्घोषणाही केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे.

Updated: Jun 17, 2019, 07:22 AM IST
मध्य रेल्वे पुन्हा कोलमडली; गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने title=

मुंबई: तांत्रिक बिघाड पाचवीला पुजलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा कोलमडली. मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यापासूनच सातत्याने मध्य रेल्वेची सेवा ठप्प होताना दिसत आहे. गुरुवारी सकाळीही मध्य रेल्वेने पुन्हा एकदा हा कित्ता गिरवला. त्यामुळे सध्या मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन तब्बल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. अनेक गाड्या दोन स्थानकांच्या मध्ये बराच काळ थांबत आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. 

विशेष म्हणजे गाड्या उशिराने का धावत आहेत, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मध्य रेल्वेकडून स्थानकांवर याबाबत कोणती उद्घोषणाही केली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. गाड्या नेमक्या कोणत्या कारणाने उशीराने धावत आहेत, हेच समजायला मार्ग नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होताना दिसत आहे. बहुतांश वेळा वाहतूक कोलमडल्याने गाड्या उशिराने धावत असल्याचे निदर्शनास आले होते. ही वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी अनेक तास लागत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.