मुंबई : लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. या चालू वर्षात म्हणजेच जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ३९ कोटी ७५ लाख ३३ हजार ७७८ इतका दंड वसूल केला आहे. शिवाय, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने चालू वर्षात ८ लाख २३ हजार ८०६ गुन्ह्यांची नोंदही केली आहे.
गेल्या वर्षीच्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान मध्य रेल्वेने ६ लाख ७७ हजार ६७७ इतके गुन्हे नोंदवले होते. त्यातून ३० कोटी ८४ लाख २७ हजार २२ रुपये दंड वसूल करण्यात आला होता. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या गुन्ह्यात २१. ५८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर २८.८९ टक्क्यांनी दंडात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी फुकट्या प्रवाशांचं प्रमाण वाढलं आहे.
मध्य रेल्वेने २०१६-१७ या वर्षांत फुकट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत तब्बल १२८ कोटी ६३ लाख रुपये दंडवसुलीतून जमा केले.
यंदा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फुकट्यांना चाप बसवण्यासाठी विशेष लक्ष दिले आहे. सकाळी गर्दीच्या वेळी संधीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे मध्य रेल्वेकडून अशा प्रवाशांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
२०१५-१६ या आर्थिक वर्षात २४ लाख ३१ हजार प्रवाशांना रेल्वेने पकडले होते. यात २०१६-१७ मध्ये १२८ कोटी ६३ लाखांची दंडवसुली झाली असून, २०१५-१६ मध्ये १२० कोटी ५७ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली होती.