सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत...

धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी देशभरात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामध्ये लोकांनी 3O,000 कोटी रुपयांचे सोने किंवा दागिने खरेदी केले आहेत.

आकाश नेटके | Updated: Nov 11, 2023, 09:33 AM IST
सोन्यावर भारतीयांच्या उड्या! धनत्रयोदशीला विकले गेले 41 टन सोनं; एकूण किंमत... title=

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीपासून (Dhanteras) सुरू झालेल्या पाच दिवसीय दीपोत्सवाचा सण आणि बाजारपेठेत उत्साह आहे. धनत्रयोदशीला बाजारपेठांमध्ये एकच झुंबड उडाली होती. विशेषत: सोन्या-चांदीचे शोरूम (gold silver sales) आणि भांडी बाजारात खरेदीदारांची मोठी गर्दी होती. शुभ दिवस पाहून ग्राहकांनी बाजारपेठेत जाऊन आपल्या क्षमतेनुसार खरेदी केली. धनत्रयोदशीनिमित्त देशभरातील सराफा बाजारांमध्ये शुक्रवारी तब्बल 30 हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशभरात 27 हजार कोटी सोन्याची आणि 3 हजार कोटी रुपयांची चांदीची उलाढाल झाली आहे. या धनत्रयोदशीला देशभरात ग्राहकांनी सुमारे 41 टन सोने आणि 400 टन चांदीची खरेदी केली आहे.

30,000 कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीची विक्री

ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचा सुमारे 30,000 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला. सोने आणि सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीचा आकडा 27,000 कोटी रुपये होता. सुमारे 3,000 कोटी रुपयांची चांदी किंवा त्याच्या वस्तूंची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये धनत्रयोदशीला 25,000 कोटी रुपयांचा सोन्या-चांदीचा व्यवसाय झाला होता.

सोन्या चांदीच्या विक्रीत 5 हजार कोटींची वाढ

पंकज अरोरा यांच्या माहितीनुसार, सोन्याचा भाव शुक्रवारी 62 हजार रुपये तोळा आणि चांदीचा भाव किलोला 72 हजार रुपये होता. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा भाव 52 हजार रुपये तर चांदीचा भाव 58 हजार रुपये होता. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला सोने आणि चांदीची एकूण 25 हजार कोटींची उलाढाल झाली होती. यावेळेस ही वाढ 5 हजार कोटींनी वाढून 30 हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

41 टन सोन्याची विक्री

एका अंदाजानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी देशात सुमारे 41 टन सोने आणि सुमारे 400 टन चांदीचे दागिने आणि नाण्यांची विक्री झाली आहे.

दुसरीकडे, ट्रेडर्स फेडरेशन कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या अंदाजानुसार, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरात 50 हजार कोटींहून अधिक रुपयांचा व्यापार झाला आहे, तर एकट्या राजधानी दिल्लीतच 5,000 कोटींपेक्षा जास्त व्यापार झाला. कॅटचे ​​राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, बाजारपेठांमध्ये लोक सोन्या-चांदीसह श्री गणेश जी, श्री लक्ष्मी जी, श्री कुबेर जी यांच्या मूर्ती किंवा फोटो खरेदी करत आहेत.

झवेरी बाजारात सोन्या चांदीच्या खरेदीसाठी रांगा

दरम्यान, मुंबईच्या झवेरी बाजारमध्येही सोन्याचांदीच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती. धनोत्रयदशीच्या निमित्ताने सोने चांदी खरेदी करण्यासाठी झवेरी बाजारातील दुकानांबाहेर ग्राहकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.