मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आता पोलीस कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी, डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. आता बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रेडियोलॉजी विभागाच्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या डॉक्टरने अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांची तपासणी केल्याची माहिती आहे.
रुग्णालयातील इतर डॉक्टर आणि कर्मचारीही या डॉक्टरच्या संपर्कात आले होते. त्यामुळे आता इतर डॉक्टरांनाही आता क्वारंटाईन केलं जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे ताडदेवच्या भाटिया रुग्णालयातील आणखी ११ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी भाटिया रुग्णालयात १४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आज सोमवारी आणखी ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता भाटिया रुग्णालयातील एकूण २५ जण कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळत आहे.
भाटिया रुग्णालय यापूर्वीच तीन रूग्णांना कोरोना झाल्यानंतर बंद करण्यात आलं होतं. कोरोना झालेल्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
जसलोक रुग्णालयातीलही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जसलोक रुग्णालयातील ३० हून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर जसलोक रुग्णालयातील इतर १०८० कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दादरमधील सुश्रृषा रुग्णालयातही २ डॉक्टर आणि ४ नर्सला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
राज्यात रात्रीत ८२ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक मुंबईत ५९ रुग्ण वाढले आहेत. आता राज्यात सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०६४ झाली आहे.