निवडणुकीसाठी सिनेअभिनेते, अभिनेत्रींना मागणी, सभा-रोडसाठी इतके घेतात पैसे?

निवडणूक आली की स्टार कलाकार प्रचारात किंवा रॅलीत दिसतात. मात्र सिनेअभिनेते आणि अभिनेत्रींचा प्रचार हा काही मोफत नसतो.

Updated: Mar 29, 2019, 09:05 PM IST
निवडणुकीसाठी सिनेअभिनेते, अभिनेत्रींना मागणी, सभा-रोडसाठी इतके घेतात पैसे? title=

मुंबई : निवडणूक प्रचार जसजसा रंगात येईल तसतसे अभिनेते आणि अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात उतरतील. सिनेअभिनेते आणि अभिनेत्रींचा प्रचार हा काही मोफत नसतो. प्रत्येकाचा बिदागी ठरलेली असते. स्टार कलाकारांच्या सहभागाने निवडणूक प्रचारातही रंगत येते. निवडणुकीच्या प्रचारात रोड शो, जाहीर सभांसाठी बॉलिवूड स्टार आणि स्टार कलाकारांना खास मागणी असते. गर्दी जमवण्याचा उमेदवारांचा फंडा असतो. आता लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक प्रचारासाठी वेगवेगळ्या कृप्त्या लढवल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून निवडणूक प्रचारात थेट बॉलिवूड तारे तारकांना उतरवलं जाते आहे. मराठी सिनेक्षेत्रातल्या तारे तारकांनाही मोठी मागणी आहे. प्रचारात बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्रींना मोठा भाव आहे.

बॉलिवूड अभिनेते रोड शो साठी ३० लाख ते १ कोटी रुपये घेतात. सभेत भाषणाचे २० लाख ते ८० लाख घेतात. मराठी अभिनेते आणि अभिनेत्री रोड शो साठी ५० हजार ते ३ लाख रूपये घेतात. लोकप्रिय मराठी मालिकांमधील अभिनेते आणि अभिनेत्रींना अधिक मागणी असते. लोकप्रियतेवर त्यांची बिदागी ठरते. काही उमेदवार आपली चर्चा जास्त व्हावी यासाठी असे प्रयोग करत असल्याचे जाणकार सांगतात.

प्रचाराला येणारी स्टार मंडळी प्रचारासाठी किती पैसे घेतात हे कधीच सांगत नाहीत. शिवाय कोणत्याच पक्षाचा शिक्का आपल्यावर बसणार नाही याची काळजी घेतात. उमेदवाराशी असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे प्रचारासाठी आल्याचे सांगतात. स्टार मंडळी प्रचारासाठी गर्दी गोळा करतात पण ते मतं किती मिळवून देतात हा संशोधनाचा विषय आहे.

प्रचाराचे दरपत्रक 

- लोकप्रिय मराठी मालिकांमधील अभिनेते, अभिनेत्रींना अधिक मागणी  
- बॉलिवूड अभिनेते रोड शोसाठी ३० लाख ते १ कोटी रुपये
- सभेत भाषणाचे २० लाख ते ८० लाख  
- मराठी अभिनेते, अभिनेत्री रोड शोसाठी ५० हजार ते ३ लाख रूपये