मुंबईत बोगस लसीकरणाचं रॅकेट! 390 जणांना टोचली चक्क बोगस लस?

मुंबईत बोगस लसीकरणाचं रॅकेट! 390 जणांना टोचली चक्क बोगस लस?

Updated: Jun 16, 2021, 07:30 PM IST
मुंबईत बोगस लसीकरणाचं रॅकेट! 390 जणांना टोचली चक्क बोगस लस? title=

गणेश कवडे, झी 24 तास, मुंबई -  देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची लोकसंख्या कोट्यावधींच्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने गृहनिर्माण संस्थांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. कांदिवलीतल्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्येही तिथल्या नागरिकांसाठी लसीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण हे लसीकरणच बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

काय आहे प्रकरण?

हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये 30 मे रोजी झालेल्या लसीकरण मोहिमेत 390 जणांनी लस घेतली. महिंद्र सिंह नावाच्या व्यक्तीनं या लसीकरणाचं आयोजन केलं होतं. नामांकित रुग्णालयाच्या नावे देण्यात आलेल्या प्रमाणपत्राची अधिकृतता पडताळल्यानंतर ते बनावट असल्याचं समोर आलं. याप्रकरणी कांदिवली पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आली आहे. 

असा उघड झाला बनाव

सोसायटीत लसीकरण झाल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र देण्यात आली नव्हती. सोसायटीतील एका व्यक्तीला परदेशी जायचं असल्यानं त्यानं प्रमाणपत्राची मागणी केली. त्यानंतर गोरेगाव नेस्को सेंटर आणि काही नामांकित रुग्णालयांच्या नावे प्रमाणपत्र देण्यात आली. त्यामुळे संशय बळावला आणि ही प्रमाणपत्रं बोगस असल्याची धक्कादायक बाब समोर आली.

लसीकरणही बोगस?

प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आल्यानंतर आता देण्यात आलेली लसही बोगस होती का असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय. सोसायटीतील तब्बल 390 नागरिकांनी लस टोचून घेतली. पण यापैकी एकालाही ताप, अंगदुखी असा कोणताच त्रास जाणवला नाही. त्यामुळे लसही बोगस असल्याचा संशय बळावलाय. लसीच्या नावाखाली आपल्या शरिरात काय सोडलं, या विचारानं लस घेतलेल्या सर्वांनाच घाम फुटलाय...

पोलिसांनी का बाळगलंय मौन?

याप्रकरणी कांदिवली पोलिसांना लेखी तक्रार दिली असली, तरी पोलिसांनी मात्र या प्रकरणावर मौन बाळगलंय. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी महिंद्र सिंह या संशयिताला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यापलिकडे पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. आता हा आरोपी फरार असल्याचं सांगितलं जातंय. हा पोलिसांचा हलगर्जीपणा आहे की आणखी काही, असा प्रश्न आता विचारला जातोय. दरम्यान, स्थानिक पोलीस असमर्थ असतील, तर CIDमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपनं केलीये.

मुंबईत बोगस लसीकरणाचं रॅकेट?

मुंबईच्या अनेक सोसायट्यांमध्ये असे लसीकरण कॅम्प घेण्यात येत आहेत. त्या ठिकाणीही कांदिवलीसारखा प्रकार घडत नाहीये ना? यामागे एखादं मोठं रॅकेट आहे का, याचा तपास पोलीस आणि महापालिकेनं करायला हवा.