Mumbai News : (Mumbai BMC) मुंबई महानगरपालिका निवडणुका (Mumbai BMC Election) आता जवळ आलेल्या असतानाच प्रत्येक पक्षाकडून शहरातील नागरिकांच्या हिताला अनुसरून काही निर्णय घेतले जात आहेत. असंख्य घोषणाही केल्या जात आहेत. याचदरम्यान एका महतत्त्वाच्या निर्णयानं सर्वांच्याच नजरा वळवल्या. मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा ही काही नवी बाब नाही. पण, अखेर प्रशासनानं याकडे लक्ष दिल्याचं किमान या निर्णयातून स्पष्ट होत आहे. कारण, मुंबईमध्ये जागतिक दर्जाचे आणि खड्डेमुक्त रस्ते बनवण्यासाठी आता पालिकेनं पहिलं पाऊल उचललं आहे.
संपूर्ण शहरात तब्बल 397 किमी अंतराचे काँक्रिटचे रस्ते बांधणार असून, त्यासाठी साधारण 6 हजार कोटींच्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदांमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामाचा अनुभव असणाऱ्या बड्या कंत्राटदारांचाही समावेश आहे.
दरम्यान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत या रस्तेबांधणीसाठी अनेक मुद्दे लक्षात घेतले जाणार आहेत. सर्वसामान्य काँक्रीटचा वापर न करता यावेळी 'पोरस' काँक्रीटचा वापर केला जाणार आहे. परिणामस्वरुप पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होणार असून, रस्त्यांवर तुंबणाऱ्या पाण्याची (water logging) समस्या बऱ्याच अंशी कमी होणार आहे (Mumbai Rain).
पोरस काँक्रीटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापस करण्यात येतो. ज्यामुळं हे काँक्रीट पाणी शोषून घेतं. यामध्ये असणाऱ्या छिद्रांमधून रस्त्यावरील पाण्याचा निचरा तुलनेनं वेगात होतो. फक्त रस्तेच नव्हे, तर फुटपाथसाठीसुद्धा हे तंत्रज्ञान फायद्याचं ठरू शकतं. थोडक्यात मान्सूनदरम्यान होणाऱ्या मनस्तापापासून आता मुंबईकरांची सुटका होणार.
सध्याच्या घडीला शहरात पालिकेत्या हद्दीत जवळपास 2 हजार किमीचे रस्ते आहेत. जे पूर्णपणे काँक्रीटचे करण्याचं धोरण पालिका राबवताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील 1 हजार किमी रस्त्यांचं काम पूर्ण झालं असून, उर्वरित काम टप्प्याटप्प्यानं होत आहे.