वर्षा बंगल्याचं पाणी बिल थकलं नसल्याचं मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

Updated: Dec 14, 2020, 07:46 PM IST
वर्षा बंगल्याचं पाणी बिल थकलं नसल्याचं मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण  title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचं पाणी बिल थकलं नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेनं दिलं आहे. वर्षा बंगल्याचं २४ लाख ५६ हजारांचं पाणी बिल थकल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती तथ्यहिन असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. वर्षा आणि त्याला जोडून असलेला तोरणा बंगल्याचं पाणी बिल निरंक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान मलबार हिल येथे आहे. यामध्ये 'वर्षा' आणि त्याच्याशी संलग्न 'तोरणा' या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासह इतर सरकारी निवासस्थानांचे पाण्याचे एकूण बिल २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी असल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरुन पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती संकलित केल्यानंतर केला होता. मुंबई महापालिकेनं शकील अहमद शेख यांचा हा दावा चुकीचा ठरवला आहे.