Model Code of Conduct : लोकसभा निवडणूक २०२४ संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व सार्वजनिक प्राधिकरणे किंवा खासगी मालमत्तांच्या ठिकाणी लावण्यात आलेले सर्व होर्डिंग, पोस्टर बॅनर तत्काळ हटविण्यात यावे. कोनशिला, नामफलक आदी बाबी झाकून टाकावेत. तसेच निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. इक्बाल सिंग चहल यांची बदली होण्यापूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला होता.
आदर्श आचारसंहितेचे पालन व त्यातील कार्यवाही याबाबत आयोजित बैठकीत डॉ. चहल बोलत होते. या वेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तआश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हाधिकारीश्री. राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, सर्व सह आयुक्त, उप आयुक्त, सहायक आयुक्त, सर्व प्रमुख अभियंता संचालक यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
बैठकीत डॉ. चहल पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाकडून लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागस्तरावरील सहायक आयुक्तांनी त्यांच्या विभागात कोणत्याही प्रकारचे विशेषतः राजकीय होर्डिंग, बॅनर, पोस्टर दिसणार नाहीत, हे सुनिश्चित करावेत. पुढील २४ तासांमध्ये सर्व होर्डिंग, बॅनर, पोस्टर काढून टाकावेत. तसेच, ते पुन्हा लावले जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी वारंवार पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले होते.
प्रसंगी सार्वजनिक मालमत्ता अधिनियमानुसार पोलिसांत तक्रार दाखल करावी. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना नियमांच्या अधीन राहून होर्डिंग, बॅनर, पोस्टर लावण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यासाठी सर्व २५ विभागांच्या कार्यालयात सिंगल विंडो सिस्टम सुरू करावी. त्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देशही आयुक्त डॉ. चहल यांनी दिले.आदर्श आचारसंहितेच्या पालनात कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा कुचराई केल्यास शिस्तभंग किंवा निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे व दक्षतेने पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सह आयुक्त तथा संपर्क अधिकारी विजय बालमवार हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील, असेही डॉ. चहल यांनी यावेळी सांगितलं होतं.
दरम्यान, मुंबई उपनगरांमध्ये मागील दोन दिवसांमध्ये १२ हजार ३०० होर्डिंग, पोस्टर, बॅनर आदी काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.